विनाहेल्मेट दुचाकी चालवली, द्यावी लागणार परीक्षा, १२ ठिकाणी वाहतूक नियमांची परीक्षा होणार
नाशिकमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर पोलिसांकडून अधिक तीव्र कारवाई केली जाणार आहे. वाहतूक विभागाच्या चारही युनिटमध्ये प्रत्येकी तीन या प्रमाणे शहरातील १२ ठिकाणी नियमांचे पालन न केलेल्या दुचाकीचालकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचेच असणार आहे.
यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने खास पुस्तकही तयार केले जाणार असून यातून अभ्यास करत वाहनधारकांना पेपर द्यावा लागणार आहे. शहरातील वाढत्या वाहनसंख्येबरोबर अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या अपघातात बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने पोलिस आयुक्तांनी दुचाकीधारकांना हेल्मेट सक्ती केली आहे.
हेल्मेट नसलेल्या वाहरधारकांवर कारवाई करत त्यांना थेट पोलिस वाहनातून ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे आणत त्याचे दोन तासांचे समुपदेशन करण्यात येते. याच पुढच्या टप्प्यात आता हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
वाहतूक विभागाच्या चारही युनिटमध्ये प्रत्येकी तीन ठिकाणी अशा पद्धतीने शहरात बारा ठिकाणी परीक्षा होणार आहे. वाहतुकीच्या नियमासंदर्भात ही परीक्षा १० मार्कांची असणार आहे. या परीक्षेत वाहनधारकांस ५ गुण प्राप्त करे गरजेचे असणार आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्या वाहनधारकांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी खास पुस्तकही तयार केले आहे.
हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांची परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी पुरेशी पार्किंगची जागा, परीक्षा देण्यासाठी बसविण्यासाठी जागा या दृष्टीने हे परीक्षा केंद्र निश्चित केले जाणार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांचे आधी समुपदेशन व आता परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र यानंतरही वाहनधारकांनी हेल्मेट परिधान न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.