सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (18:27 IST)

भंडारा जिल्ह्यात दुश्मनीमध्ये 33 एकर पिकाला आग

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मोठ्या कष्टाने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीच्या गंजी लावल्या होत्या. पावसाची उघडीप झाली की, मळणी कामे केली जाणार होती. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा एका रात्रीत झाला आहे. नेमके यामगचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, 8 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
17 शेतकऱ्यांच्या गंजीचा समावेश
पावसापुर्वी कापणी झालेल्या 33 एकरातील भातशेतीच्या गंजी किन्हीझमोखे शिवारात लावण्यात आल्या होत्या. 17 शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी या गंजी लावल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री अज्ञात इसमांनी या गंजीला आग लावली. यामध्ये 17 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 25 हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भातशेतीची जोपासना करण्यासाठी एकरी 10 हजार रुपये खर्ची करावे लागले आहेत. तर भर पावसात कापणीची कामे शेतकऱ्यांनी केली होती. यातून उत्पादन तर सोडाच पण कोणत्या कारणावरुन हे कृत्य करण्यात आले याचा देखील अंदाज शेतकरी बांधू शकत नाहीत.
 
यामुळे केली एकाच ठिकाणी साठवणूक
भंडारा जिल्ह्यात अद्यापही धान खरेदी केंद्र हे सुरु झालेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी खरेदी केंद्र होईस त्याच ठिकाणी गंजी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गंजी ह्या शेतातच होत्या. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने 33 एकर शेतीतील धानाच्या गंजीला आग लावून जाळून टाकले.
 
पोलीसांना या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली असून ‘आम्हीच गंजी जाळल्या’ असा एवढाच उल्लेख करण्यात आला होता. ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत सर्व गंजी ह्या जळून खाक झाल्या होत्या.