सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (18:21 IST)

सरदार अटलबहादूरसिंह - एक अफलातून व्मक्तिमत्व

नागपूर शहरातील एक चिरपरिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेलेले सरदार अटलबहादूर सिंह यांचे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. गेली काही वर्षे ते आजारीच होते. त्यामुळे त्यांचे निधन ते अपेक्षितच होते. तरीही समस्त नागपूरकरांना चटका लावून जाणारे निधन असेच या महाप्रयाणाचे वर्णन करता येईल.
 
नागपूरच्या राजकारणाची एक खासियत आहे. इथे राजकीय मतभेद विसरून मैत्री केली जाते. जशी मैत्री करतात तशीच ती मैत्री जपतातही ती मैत्री जपताना भिन्न विचारधारा कधीही आडव्या येत नाही. सरदार अटलबहादूर सिंह हे अशीच मैत्री जपणार्‍याचे एक जिवंत प्रतीक होते म्हटले तरी वावगे ठरू नये याचे प्रत्यंत्तर काल सायंकाळी झालेल्या श्रद्धांजली सभेत दिसून आले. शहरातल्या सर्वच पक्षांचे नेते मतभेद विसरुन या सरदारला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र झाले होते.
 
विचारधारेने डावीकडे झुकलेले सरदार अटलबहादूर सिंह यांनी आपल्या ५५व्या वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत काही अभाव वगळता अपक्ष म्हणूनच राजकारण केले. मात्र अपक्ष म्हणून राजकारण करत असताना ते कायम किंग मेकरही राहिले. त्यांना दोनदा नागपूर नगरचे महापौर म्हणून राहण्याचा बहुमान मिळाला. माझ्या आठवणीनुसार दोनदा महापौर होण्याचे भाग्य अगदी मोजक्यांनाच मिळाले त्यात सरदार एक होते.
 
आपल्या राजकीय कारकीर्दीत ते एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले. १९६० च्या दशकात ते विद्यार्थी नेते म्हणून राजकारणात सक्रिय झाले. मात्र अल्पावधीत त्यांनी आपल्या नावाचे वलय तयार केले होते. १९६८ साली विदर्भात कृषी विद्यापीठ व्हावे म्हणून त्यांनी आंदोलन उभे केले. परिणामी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना तब्बल सहा महिने अटकेत ठेवले होते. यावरुन त्यांचा दरारा काय होता हे लक्षात यावे. १९६९ मध्ये ते अपक्ष म्हणून नागपूर महापालिकेत निवडून आले. तेव्हापासून २०१२ पर्यंत नागपूर महापालिकेच्या राजकारणाचे किंग मेकर म्हणूनच ओळखले गेले होते.
 
सरदार अटलबहादूर सिंह हे फक्त राजकारणीच होते असे नाही तर एक रसिक व्यक्तिमत्वही होते. त्याचबरोबर एक संवेदनशील माणूस, एक सुसंस्कृत व्यक्ती, एक क्रीडाप्रेमी म्हणूनही त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. आपल्या महापौर पदाच्या कालखंडात त्यांनी अनेक चांगले उपक्रम नागपुरात राबवले. नागपूर महापालिकेच्या रौप्य महोत्वसानिमित्त अनेक मान्यवर कलावंतांचा लाभ त्यांनी नागपूरकरांना दिला होता. लता मंगेशकरांचाही सत्कारही त्यांना नागपुरात घडवून आणला होता.
 
आधी म्हटल्याप्रमाणे सर्वच पक्षातल्या नेत्यांची त्यांचे मैत्रीचे संबंध होतेच भाजपचे नितीन गडकरी आणि अटलबहादूर सिंह यांची मैत्री जगजाहीर होती. ना नामपर ना दामपर मोहर लगेंगा नितीन गडकरी के कामपर  अशी घोषणा अटलबहादूर सिंह यांनी सुरु केली होती. गडकरींच्या आग्रहा खातर ते २००३ मध्ये भारतीय जनता पक्षात आले. भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना लोकसभेची उमेदवारीही दिली. मात्र नागपूरच्या भाजप समर्थकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्या काळात नागपुरात विलास मुत्तेमवारांचा जोर होता. परिणामी अटलबहादूर सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र त्याची खंत न बाळगता त्यांनी समाजकारणात स्वतःला झोकून दिले होते.
 
मैत्री जपणे हा त्यांचा स्थायीभाव होता. आपल्या मिष्किल शैलीने ते प्रत्येकाशी बोलायचे. सरदार व्यक्तिंवर विनोद होणे यात काही नवीन नाही. मात्र स्वतः सरदार असल्याबद्दल स्वतःवरच विनोद करुन खसखस पिकविण्याची त्यांची एक आगळीवेगळी शैली होती. एकदा त्यांना काहीतरी खाण्याबद्दल मी खूप आग्रह केला. त्यावेळी सकाळचे ११.१५ वाजत होते. जेव्हा मी आग्रहाचा अतिरेक केला तेव्हा घड्याळ बघत सरदार बोलले, देख अविनाश मुझे उल्लू बनानेका टाईम होने के लिए अभी ४५ मिनिट बाकी है तबतक मैं तेरे कहने में नहीं आनेवाला हुंं असे म्हणत त्या बैठकीत हास्य फुलवून अटलबहादूर सिंह  यांनी पटकन विषय बदलला. देवेेंंद्र फड़णवीस मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटून देख देवेन, तेरे बाप के साथ मैंने राजनीति सिखी है, थो़ डा हम बुजुर्गो का भी सुनते जा बेटा असे सुनावण्याची ताकद या माणसात होती. कोणत्याही मोठ्या व्यक्तीला त्याची चूक दाखविण्याची हिंमतही या माणसाने कायम जपली होती.
 
एक संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवकांना त्यांच्या नावावर औषधे विकत घेऊन ती लोकांना देण्याची मुभा होती त्याची देयके महापालिका मंजूर करायची. २००२-०३ या काळात नागपूर महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विशेषतः नगरसेवकांनी औषधांची बिले दाखवून पैसा कमावला असा आरोप केला गेला. त्यावेळी अटलबहादूर सिंह यांचेही नाव त्यात गोवले गेले. अटलबहादूर सिंह अनेक वर्ष एकटेच राहत होते. त्यांनी महापालिकेत सादर केलेल्या बिलांमध्ये गर्भावस्थेत आणि बाळांतपणानंतर स्त्रियांनी घ्यायच्या औषधांचीही बिले असल्याची चर्चा होती. नागपूरच्या पत्रकार भवनात आम्हा काही पत्रकारांसोबत बसले असताना हा विषय निघाला. त्यावेळी त्यांनी केलेला खुलासा खरोखरी मनाला चटका लावणारा होता. त्यांच्या मतदार संघात असलेली एक गरीब महिला त्यांच्याकडे आली आणि सुनेची गर्भावस्थेत प्रकृती ठिक नाही आणि तिला औषधे द्यायला पैसा नाही असे सांगून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी संंबंधित दुकानदाराला या बाईच्या सुनेचे बाळांतपण होईपर्यंत सर्व औषधे दे आणि बिल माझ्याकडे पाठव असे त्यांनी सांगितले आणि त्यानुसार सर्व औषधांचा खर्च त्यांनी महापालिकेच्या निधीतून करुन दिला होता. महापौर असताना आणि नसतानाही कित्येक होतकरु मुलांची कॉलेजची फी देखील त्यांनी भरली होती.
 
शिख समाजाचे असलेले सरदार अटलबहादूर सिंह हे नागपूर शहरातच लहानाचे मोठे झाले. त्यामुळे मराठीवरही त्यांचे चांगले प्रभूत्व होते. इतकेच काय पण मराठीसाठी संघर्ष करण्याचीही त्यांची कायम तयारी होती. १९८३ साली नागपुरात भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेटचा कसोटी सामना झाला. त्यावेळी नागपूर आकाशवाणीने या सामन्याचे मराठीत समालोचन केले होते. आकाशवाणीतील काही हिंदी भाषिकांना ते मान्य नव्हते. त्यांनी दिल्लीत आपले वजन वापरून यानंतर नागपूर आकाशवाणीला मराठीत समालोचन करता येणार नाही असा आदेश आणला. त्यावेळी नागपुरातील मराठी भाषिक खवळले. माजी कुलगुरु वि.भि. कोलते, प्राचार्य राम शेवाळकर अशा दिग्गजांनी आकाशवाणी चौकात धरणे दिले. त्यानंतर नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विधीमंडळावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व मराठी प्रेमी झाशी राणी चौकाजवळ जमले. मोर्च्याला सुरुवात होतेवेळी सरदार अटलबहादूर सिंह तिथे पोहोचले. नागपूरचा माजी महापौर मोर्च्यात आला आहे म्हटल्यावर सगळ्यांचाच उत्साह वाढला. त्याठिकाणी ध्वनीवर्धक हातात घेत शुद्ध मराठीत भाषण देवून मराठीच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. वि.भि. कोलते आणि राम शेवाळकर यांच्या नेतृत्वात मी देखील मोर्च्यात सहभागी होत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि विधान भवनापर्योंत ते मोर्चेकर्‍यांसोबत पायी चालत आले. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातही ते गेले आणि मराठीचा आवाज त्यांनी बुलंद केला. प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. वि.भि. कोलते अशा मान्यवर मराठी साहित्यिकांच्या नागरी सत्कारासाठीही त्यांनी कायम पुढाकार घेतला होता.
 
असे हे अफलातून व्यक्तिमत्व नागपुरात अनेकांशी मैत्र जपून होते. त्यात माझाही समावेश होता. कुठेही भेटले की आवर्जुन चौकशी करायचे. अनेक समारंभामध्ये ते व्यासपीठावर तर मी प्रेक्षकात किंवा पत्रकार कक्षात बसलेलो असायचो. मात्र मी दिसलो की भाषणात ते आवर्जुन उल्लेख करायचे. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तर येण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. माझे वडील, आई यांच्या निधनानंतर आवर्जुन भेटणारे ते एक होते. माझ्या नव्या घराच्या वास्तूपुजनाला त्यांना निमंत्रण दिले होते. त्या दिवशी रात्री उशीरा माजी महापौर कुंदाताई विजयकर यांना सोबत घेऊन अटलबहादूर सिंह पोहोचले. किसी दोस्त का नया घर बन रहा ये मेरे लिए खुशी की बात है असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.
 
गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने पिडित होते. त्यामुळे सामाजिक जनजीवनापासून ते काहीसे तुटले होते. मात्र तरीही फोन केला की लगेच उचलून नमस्कार म्हणून ते खास शैलीत प्रतिसाद द्यायचे. जास्त बोलणे होत नव्हते तरीही प्रत्येक सुह्रदाशी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
 
असे हे मुळचे नागपूरकर नसलेले पण नागपुरात अगदी दुधात साखर मिसळावी तसे विरघळून गेलेले व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. नागपुरात राजकीय मतभिन्नता बाजूला ठेवून संबंध जपण्याची परंपरा त्यांनी जोपासली त्याचबरोबर नागपूर नगरीला नवा सांस्कृतिक चेहरा देण्याचीही मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांनी सुरु केलेल्या या परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
अविनाश पाठक