लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता येणार
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील लाखो बहिणी लाभ घेत आहे. गरजू बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारकडून मिळत आहे. बहिणींच्या बँक खात्यात थेट 1500 रुपये मासिक दिले जातात.
रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने जुलै 2025 महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता 9 ऑगस्ट 2025 पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी राज्य सरकारने एकूण 746 कोटींचा निधी वितरित केला आहे.
या योजनेला एकवर्ष पूर्ण होत असताना विरोधी पक्षाकडून ही योजना बंद होण्याचे चुकीचे प्रचार केले जात आहे. या योजनेला ऑगस्ट 2025 मध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे.
या योजनेसाठी ना आदिवासी विकास विभागाचा, ना सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरण्यात आलेला आहे. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असून तो केवळ महिलांच्या शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आदिवासीं व मागासवर्ग विभागाचा निधी वळवल्याचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला.
या निर्णयाचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करताना नमूद केले की, “हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे.”
Edited By - Priya Dixit