गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 मार्च 2026 (15:18 IST)

SSC & HSC Exam : बोर्ड परीक्षेत कॉपी प्रकरणात मोठी कारवाई;103 कर्मचारी निलंबित

Copying case in board exams
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा सामूहिक कॉपीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने हे प्रकार समोर आले.
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस येत असल्याने परीक्षा केंद्रांवरील दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी 103 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. 
 
बारावी परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला.10 फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरच्या वेळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर  येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय येथेही सामूहिक कॉपीचा प्रकार आढळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्यवेक्षक व केंद्र संचालक विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे दिसून आल्याने 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
 
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंद्रात इंग्रजीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करताना आढळले. या प्रकरणी 5पर्यवेक्षक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
वाशिम जिल्ह्यातील जुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय केंद्रात 16 फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्राच्या परीक्षेत 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे आढळून आले. प्रयोगशाळा परिचराकडे मोबाइल आढळल्याने तीन संस्थांतील सहा शाळांमधील 27 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.वाशिम जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवरही बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
 
गडचिरोली जिल्ह्यातील ब्रोमनवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केंद्रात  येथे राज्यशास्त्राच्या पेपरदरम्यान मायक्रोनोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले साहित्य वापरून कॉपी केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्याऐवजी डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षिका तसेच संबंधित विद्यार्थी आणि तोतया विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्रप्रमुख व पर्यवेक्षिकेस निलंबित करण्यात आले आहे.
 
 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल केंद्रात येथे रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान नऊ विद्यार्थी कॉपी  करताना आढळले. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांकडे मोबाइल सापडले. या प्रकरणी तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit