शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:39 IST)

'मिसळसम्राट' लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

महाराष्ट्राचे 'मिसळसम्राट' अशी ख्याती असलेले सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर (८४) यांचे  निधन झालं आहे. अल्पशा आजारामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 'मामलेदार मिसळ' हा ठाण्याचा ब्रँड त्यांनी निर्माण केला.
 
'मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. 
 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मामलेदार मिसळी'चे चाहते आहेत. गेल्याच वर्षी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला होता. राज यांच्यासोबतच नारायण राणे देखील ठाण्यात असले की मामलेदार मिसळ आवर्जुन मागवून घेतात. इतकेच नव्हे, तर विधीमंडळाच्या अधिवेशनातही नारायण राणे ५०० ते ६०० प्लेट मिसळ थेट मुंबईला मागवून घ्यायचे आणि सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मेजवानी द्यायचे.