शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (09:26 IST)

मनिषा कायंदे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

social media
शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
मनिषा कायंदे या शिवसेनेच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
 
2012 साली डॉ. कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला. आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना मनिषा कायंदे म्हणाल्या, "मी शिवसेनेत 2012 मध्ये प्रवेश केला होता. पक्षाने मला विधान परिषदेवर संधी दिली होती. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली होती. पण हा बदल आता का झाला याला काही कारण आहे.
 
"एकनाथ शिंदेंच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्यावरील टीकेला त्यांनी कामातून उत्तर दिलं. आज महाराष्ट्रात ज्या वेगाने काम सुरू आहे, ते काम त्यांनी केलं आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी पक्षाची पुनर्बांधणी केली नाही. किंवा आत्मपरिक्षणही केलेलं नाही," असं कायंदे म्हणाल्या.
 
"आम्हाला पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, आमचं ऐकलं जात नसेल, कार्यकर्त्यांकडून पैसे उकळण्यात येत असतील, तर ती बाळासाहेबांची शिवसेना नाही. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे."
 
"आम्ही तिथे असताना आम्ही चांगले, पण आम्ही गेलो की कचरा म्हटलं जातं. पण कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती कशी होते, हे आम्ही दाखवून देऊ," असं कायंदे यांनी म्हटलं.
 
2018 साली जेव्हा शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरीही ठाकरे निर्णयावर ठाम राहत त्यांनी कायदेंना विधान परिषदेत पाठवलं होतं.
 
मुंबईत 18 जून उद्धव ठाकरे यांच्या गटाचं राज्यव्यापी शिबीर होतं. राज्यातील जवळपास चार हजार पदाधिकारी आणि नेते या शिबिराला उपस्थित होते. या शिबिरातही मनिषा कायंदे हजर नव्हत्या. त्यामुळे, सकाळपासूनच त्यांच्या पक्षांतराच्या वृत्तांनी जोर धरला होता.
 
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यांकडून कायंदेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. पण आता शिंदे गटात त्या प्रवेश करत असल्याचं कळताच, ठाकरे गटातील नेत्यांनीही कायंदेंवर टीका सुरू केली आहे.
 
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनिषा कायंदेंवर टीका केली.
 
एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या की, “त्या फिरता चषक आहेत. त्या इकडून-तिकडे फिरतच असतात. आमचा पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच चालतो.”
 
स्वत: मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेशाबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नसला, तरी ठाकरे गटातील नेत्यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सत्तेसाठी काही जण जात आहेत, असं ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे.
 
बीबीसी मराठीने दोन ते तीनवेळा मनिषा कायंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीय.
 
दरम्यान, आज (18 जून) उद्धव ठाकरे यांचं संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राज्यव्यापी शिबिरात भाषण होणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मनिषा कायंदेंवर काही बोलतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
माजी आमदार शिशिर शिंदेंचाही राजीनामा
कालच (17 जून) शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. चार वर्षांपूर्वी शिशिर शिंदे मनसेतून शिवसेनेत परतले होते. मनसेत असताना ते एकदा आमदार म्हणूनही निवडून आले होते.
 
मात्र, गेल्या चार वर्षात शिवसेनेत कुठलीही जबाबदारी दिली नसल्यानं ही आयुष्यताली वर्षे फुकट गेल्याची खंत व्यक्त करत शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिलाय.
 




Published By- Priya Dixit