रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (16:45 IST)

अनेकांना वाटतं होतं मी निवृत्त होईन, पण तसं घडलं नाही -शरद पवार

विधानसभा निवडणुकीत पवाराचं राजकारण संपलं आहे, असं म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत समाचार घेतला. “अनेकांना वाटत होतं की, मी निवृत्त होईल. पण तसं घडलं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं तसं घडू दिलं नाही,” असं म्हणत शरद पवारांनी भाजपाच्या नेत्यांना उत्तर दिलं. बारामतीमध्ये कृषीप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलण्याला सुरूवात करताच पवारांनी भाजपाच्या नेत्या नाव न घेता टोला लगावला. 
 
पवार म्हणाले, “अनेकांना वाटतं होतं की, मी निवृत्त होईल. पण, तसं घडलं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं घडू दिलं नाही आणि मी काही अशात निवृत्त होणार नाही,” असं पवारांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. कृषीप्रदर्शनाविषयी पवार यांनी मनोगत व्यक्त केलं. “जगाची शेती बदलली आहे. शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. संशोधन करण्याची गरज आहे. कुठे संशोधन होत असेल आणि ते चुकीचं असेल तर नाकारलं तर हरकत नाही. पण उपयुक्त असेल तर ते थांबवण्याची भूमिका चुकीची आहे. ठिबक घराघरामध्ये पोहोचले आहे. पाण्यावर मर्यादा आणण्याच्या सरकारच्या कल्पना रास्त आहेत. पण, शेतीमध्ये पैसा गुंतवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही. त्यासाठी सहकार यायला हवा,” असं पवार यांनी सांगितलं. कोण म्हणालं होतं पवारांचं राजकारण संपलं? राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात शरद पवारांविषयी बोलले होते. “शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. लोकांना फोडाफोडीचं राजकारण आता आवडत नाही. नवी पिढी आमच्यासोबत का आहे? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत,” असं फडणवीस म्हणाले होते.