मराठा आंदोलन तीव्र, मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदेंचा दौरा रद्द !
नाशिक : जिल्ह्यातील पळसे गावात असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते होणार होता. मात्र जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग तीव्र होत असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
आज नाशिक सहकार साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता. मात्र संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांसह ,आमदार, खासदार,मंत्र्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून त्यामुळे आज पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. साधुसंत आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उमटत आहे. अशातच जिल्ह्यातील जवळपास ५०० पेक्षा जास्त गावांत राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला गावात प्रवेश न देण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कल्याण- डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावध पवित्र घेतला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने आणि विशेष प्रयत्नांतून गेली कित्येक वर्षे बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात आला.
खासदार हेमंत गोडसेंच्या नेतृत्वाखाली आज या कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार होता. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदेसह , खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आणि जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गटाचे) पदाधिकारी उपस्तिथीत राहणार होते. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी माध्यमांना दिली आहे. सोबतच आपण मराठा समाजाच्या भावनांचा विचार करूनच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. साधुसंत ,आणि शेतकरी बांधवाच्या उपस्तिथीत हा कार्यक्रम होणार आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor