1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (08:39 IST)

नाशिकच्या गोदातीरी होणार भव्य दीपोत्सव! गोदामाई होणार तेजोमय…

नाशिकभूमी ही रामायणातील महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार राहिलेली आहे. यामुळे अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावर ज्याप्रमाणे दीपोत्सव साजरा होतो तशा भव्य दीपोत्सवाचे आयोजन नाशिक नगरीत होत आहे. यंदाच्या दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी म्हणजेच बुधवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी पंचवटीतील गांधी तलाव, तसेच गोदाघाटावर तब्बल 11 हजार दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प यंदा करण्यात आला आहे. श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 
दीपोत्सवाचा हा उपक्रम सूत्रबद्ध पद्धतीने व अनुशासनपूर्वक व्हावा, यासाठी दीपोत्सवामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी होऊन दिवे लावण्यासाठी नावनोंदणी करून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या नाशिककरांनी कार्यक्रमाला येताना पर्यावरणपूरक मातीच्या पणत्या, कापसाची वात, तेल, तसेच मेणबत्ती व आगपेटी सोबत आणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
श्रीरामकृष्ण आरोग्य मिशनचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांच्या ‘जागृत नाशिक, जागृत भारत अभियान’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उत्सव शहरातील गोदावरीच्या तीरावर लोकसहभागातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण, सामाजिक एकात्मता, प्रदूषण निर्मूलन व व्यसनाधीनतेविरूद्ध संघर्षाबाबतही संदेश देण्यात येणार आहे. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गोदातीरी दीप लावण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी श्रीकंठानंद यांनी केले आहे.






Edited By - Ratnadeep ranshoor