रम्य संध्याकाळ, गुलाबी थंडी आणि भावपुर्ण आशयघन मराठी गजलांचा नजराणा रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. संस्कार भारती, वाशी समिती ने मराठी गजल मुशायरा 'गजलांकित' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवार ११ डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजता कन्नड संघ टेरेस, वाशी, सेक्टर ९, नवी मुंबई येथे रसिक श्रोत्यांना ह्या गजल कार्यक्रमाची मैफल विनामुल्य अनुभवता येणार आहे.
ह्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या कवींचा गजल मुशायरा ऐकावयास मिळणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमात जनार्दन केशव म्हात्रे (ठाणे), आनंद पेंढारकर (सावंतवाडी), विशाल राजगुरू (सोलापूर), प्रथमेश तुगांवकर (उस्मानाबाद) या कवींसह ज्येष्ठ गजलकार व समीक्षक डॉ. राम पंडित यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमाचे निवेदन कवियित्री यामिनी दळवी करणार आहे. एकापेक्षा एक अशा गजलांची शब्द मैफल ऐकण्याची पर्वणी आणि संधी रसिक श्रोत्यांनी जरूर अनुभवावी.