गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (21:26 IST)

महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये भीषण स्फोट

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ब्लू जेट केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती आहे. तर पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, महाड एमआयडीमधील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी (3, नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला.
 
गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी दाखल झाले आहेत.
 
या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पोलीसही दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Edited By - Ratnadeep Ranshoor