शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:20 IST)

नाशिकच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकारची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

माया सोनवणे व ईश्वरी सावकार
नाशिकच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार ह्या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या दोघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.उत्तम फिरकीपटू माया सोनवणे ने २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती.तसेच ह्या सगळ्या लक्षणीय कामगिरी च्या जोरावर मायाची गेल्या दोन हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी देखील इंडिया ए संघात निवड झाली होती.
 
सलामीवीर ईश्वरी सावकार ने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे , जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती . तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – १८ एप्रिल आंध्र , १९ एप्रिल केरळ , २१ एप्रिल मेघालय , २२ एप्रिल हैद्राबाद व २४ एप्रिल राजस्थान विरुद्ध. माया सोनवणे व ईश्वरी सावकारच्या ह्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोनही महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.