चांदगुडे दांपत्यांकडून मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन
मासिक पाळीवर नेहमीच संकोचाने बोलले जाते. मात्र या गोष्टीला छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दांपत्यांनी केले आहे. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी चांदगुडे दांपत्यांनी मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले. या क्रांतिकारी उपक्रमाची समाजमाध्यमातुन चर्चा होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त कृष्णा व अॅड विद्या चांदगुडे यांची तेरा वर्षेची मुलगी यशदा हिला परवा प्रथमच मासिक पाळी आली. त्यानिमित्ताने महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीचे आयोजन करण्यात आले होते. आता माझी पाळी, मीच देते टाळी हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबवला गेला. मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातून जनजागरण केले. या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात कोष हा लघुपट दाखवला गेला.
मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता यावेळी म्हटल्या गेली. संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणाऱ्या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. महिला व पुरुषांचा मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र झाले. यावेळी मासिक पाळी या विषयावर असलेली प-पाळीचा ही पुस्तिका वितरीत केल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.