रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (08:04 IST)

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे निर्देश
 :- राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर, सदस्य दीपक मेजारी, अभय छाजेड यांच्यासह व्हिसीद्वारे बाळासाहेब लांडगे, धनंजय भोसले, प्रकाश तुळपुळे, प्रशांत देशपांडे, स्मिता यादव, सुंदर अय्यर, उदय डोंगरे, राजाराम राऊत, सोपान कटके, निलेश जगताप, संदीप चौधरी, गोविंद मुथुकुमार, खासगी सचिव अविनाश सोलवट, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी आपण सामना करत आहोत. या कोविड संकटामुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने काम केले पाहिजे. राज्याच्या क्रीडा विकासात भरीव योगदान देण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
 
ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.