शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (19:13 IST)

पाच कोटींच्या 31 गाड्या चोरणारी कोल्हापुरातली टोळी कशी झाली गजाआड?

आलिशान गाड्यांची चोरी करून त्या गाड्यांची विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केली आहे.
या टोळीकडून राज्यासह परराज्यातून महागड्या गाड्यांची चोरी करून विक्री केली जात होती.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चोरी प्रकरणी देशातली ही मोठी कारवाई आहे, यात तब्बल साडेपाच कोटी किमतीच्या एकूण 31 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
हे सगळं करण्यासाठी चंदगड तालुक्यातील कोदाळी इथल्या ग्रीन रिसॉर्ट हॉटेलचा वापर करण्यात येत होता.
दरम्यान या प्रकरणात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधाराचा तपास सुरू असल्याचं पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितलं. अटकेत असलेल्या या तिघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
कोल्हापूरमध्ये शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरीबाबतची तक्रार पोलिसांकडे आली होती. हातकणंगले इथून गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारीनुसार एमआयडीसी शिरोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस या कार चोरीचा तपास करत होते.
या दरम्यान बेळगावमधून एक व्यक्ती चोरलेली गाडी विकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोदाळी इथं एका रिसोर्टवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
असा रचला सापळा
पोलिस अंमलदार रामचंद्र कोळी यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली 11 जणाचं पथक तयार करण्यात आलं. या पथकाकडून कोदाळी इथल्या ग्रीन हिल रिसोर्टवर सापळा रचण्यात आला.
रिसॉर्टच्या पार्किंगमधून पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. यात जहीरअब्बास अब्दुलकरिम दुकानदार, यश प्रशांत देसाई आणि खलीलमहंमद लियाकत सारवान यांचा समावेश आहे.
त्यावेळी पोलिसांनी कोल्हापूरमधून चोरीला गेलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीसह इतर सात गाड्या जप्त केल्या. संशयित आरोपींकडून या गाड्या चोरी करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
चौकशीदरम्यान सारवान याच्याकडून आणखी पाच अशा एकूण 13 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. तर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आणखी 18 गुन्हे समोर आले असून आणखी 18 गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळं एकूण 31 गाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
सध्याच्या गाड्यांना अत्याधुनिक पद्धतीचे लॉक असतानाही या गाड्या चोरण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत होतं. चोरट्यांकडूनही तितक्याच शिताफीने या गाड्या चोरी केल्या जात होत्या. लॉक असलेल्या वाहनांचे लॉक उघडण्यासाठी या चोरट्यांनी शक्कल लढवली होती. यासाठी वाहनांच्या काचेवर असलेल्या सांकेतिक कोडचा वापर होत होता.
 
मोबाइलच्या सहाय्याने हा सांकेतिक कोड हॅक करुन लॅपटॉपमधून त्या गाडीची लॉक सिस्टीम ब्रेक करण्यात येत होती. त्यानंतर कोणत्याही चावीने या गाड्यांचे दरवाजे खुले करुन गाड्या चोरी करण्यात येत होत्या.
 
पण चोरीची गाडी विक्री करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करत चोरट्यांनी याबाबतही काळजी घेतली होती. परराज्यातील गाड्या महाराष्ट्रात विक्री करताना या गाड्यांच्या नंबरप्लेट बदलण्यात आल्या होत्या. तसंच गाडीचे चेस, इंजिन नंबर यात फेरबदल करण्यात येत होते. त्यानंतर ज्यांना गाडी विकली जात होती त्यांच्याकडून काही रक्कम रोख स्वरुपात घेत विना कागदपत्रं या गाड्या विकल्या जात होत्या.
 
रोख मिळालेली रक्कम घेऊन ही टोळी पोबारा करत होती. त्यामुळं वीस ते चाळीस लाख किमतीच्या गाड्या मिळेल तेवढ्या किमतीत विकून ही टोळी पसार होत होते.
 
विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा कारागृहातून ही सगळी सूत्रं हलवत असल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.
बेळगावमध्ये राहणाऱ्या आकाश देसाईकडून ही टोळी चालवण्यात येत होती. यासाठी मणिपूर इथला राजकुमारकिरण सिंग हा त्याचा साथीदार त्याला मदत करत होता.
परराज्यातून चोरलेल्या गाड्या या आकाश देसाई महाराष्ट्रातील साथीदारांकरवी बेळगाव, कोल्हापूर , सातारा , सांगली या परिसरात विक्री करत होता. ही विक्री करण्यासाठी आकाश देसाई याने कोदोळी इथलं हॉटेल ग्रीन रिसॉर्ट घेतलं होतं. याच ठिकाणी या गाड्यांचे व्यवहार होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या आकाश देसाई हा नार्कोटिक्सच्या गुन्ह्या अंतर्गत कारागृहात आहे. मात्र कारागृहात राहून त्याने ही टोळी कार्यरत ठेवली होती. न्यायालयाच्या परवानगीने आकाश देसाई यांला ताब्यात घेतले जाणार असून मणिपूर इथून राजकुमार किरण सिंग याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.
अटकेत असलेल्या संशयित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या यश देसाई याचा नातेवाईक असलेला आकाश देसाई यालाही लवकरच अटक करणार असल्यांची माहिती पोलिस अधिक्षक बलकवडे यांनी दिली.
देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या गाड्या जप्त करण्याची देशातली ही मोठी करवाई असल्याचं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, हरयाणा, पंजाब या उत्तरेतील राज्यातून तसंच आसाम,मणिपूर अशा पूर्वोत्तर राज्यातून या गाड्यांची चोरी करण्यात येत होती. लाखो किमतीच्या गाड्यांची चोरी करुन महाराष्ट्रात या गाड्यांची विना कागदपत्रं विक्री करण्यात येत होती.
या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांमध्ये स्वीफ्ट, फॉर्चुनर, इनोव्हा अशा गाड्यांचा समावेश आहे. या आंतरराज्य टोळीकडून केवळ आलिशान गाड्यांची चोरी करण्यात येत असल्याचं माहिती पोलिसांना मिळाली आहे.
याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपींकडून एकुण पाच कोटी पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात तीन फॉर्चुनर, नऊ इनोव्हा, सात ह्युंदाई क्रेटा, तीन किया सेल्टॉस, एक स्कॉरपिओ, एक इर्तिगा, दोन ब्रिझा आणि पाच स्विफ्ट डिझायर अशा एकतीस गाड्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे उघडकीस आले असून आणखी अठरा वाहनांची चोरी नेमकी कुठून करण्यात आली याबाबतचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं.
आलिशान वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्या पथकाला पस्तीस हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.