शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:37 IST)

संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल असे वाटले होते : भुजबळ

गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. छगन भुजबळ यावर बोलताना म्हणालेत, गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्टमधून संमेलनस्थळ पाहणी केली, असा काहीतरी प्रकार घडेल अशी सकाळपासून कुणकुण होती, असंही भुजबळ म्हणाले. संभाजी ब्रिगेडशी काहीतरी वाद आहे, याचाही अंदाज होता. मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं. असं भुजबळ म्हणाले. पुण्यातून २ जण मोटरसायकलवर आले होते, त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं त्यावेली हा प्रकार घडल्याचं भुजबळांनी सांगितलं. पंकज भुजबळ यानी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी काळी पावडर फेकली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. शाईफेक करणाऱ्या दोन संशयीतांना ताब्यात घेतल्यांची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंंदवला आहे. साहित्य संमेलाच्या ठिकाणी असा प्रकार करणे अत्यंत चुकीचं आहे, यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तर गिरीश कुबेर यांच्या लिखानात काही चुका असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी नोंदवलं आहे. ते लिखाण अजून मी वाचलं नाही, त्यांच्या लिखानाबाबत मतभेद असू शकतात, तसेच छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह लिखान करणे चुकीचे आहे, तसे लिखाण झाल्यास लोकांना वेदना होतात असंही राऊत म्हणाले आहेत.
 
मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया
गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तक लिहिले आहे, यात आक्षेप आहे लिखाण आहे असे समजते. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रपुरुषांबद्दल लिहिताना जिथे अनेक लोकांच्या श्रद्धेचा विषय असताना इतिहासाचे दाखले देताना खूप सांभाळून लिहिलं बोललं गेलं पाहिजे, असे मत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जातात याचा विचार केला गेला पाहिजे. असंही कायंदे म्हणाल्या आहेत
 
प्रवीण दरेकरांकडून अप्रत्यक्ष समर्थन
संभाजी ब्रिगेडच्या या शाईफेकीचं भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. ही संभाजी ब्रिगेडची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.
 
छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
मला वाटतं काही लोक कारण नसताना वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. छत्रपती संभाजी महाराज असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असोत. ही सर्व आमची दैवतं आहेत. त्यांच्याविषयी कारण नसताना अकलेची तारे तोडले जातात. काही लोकांना वाटतं मोठ्या पुरुषांवर वक्तव्य केली तर वाद तयार होईल आणि आपण चर्चेत राहू. चर्चेत राहिल्यावर आपल्याला वेगळी ओळख मिळेल, असं काही लोकांना वाटतं. त्यामुळे हे लोक बरळत असतात, असंही दरेकर म्हणाले.
 
एखाद्या अज्ञानी आणि समज नसलेल्या माणसाने एखादी गोष्ट केली तर समजू शकतो. पण जी लोकं स्वत:ला विद्वान समजतात. ज्यांच्या लेखणीतून संस्कार द्यायचे असतात. त्यांनीच जर वातावरण कलुषित करणाऱ्या गोष्टी केल्या असतील तर त्या चुकीच्या आहेत. त्यांनी अशा गोष्टी करताना विचार करून लिहिलं पाहिजे. संपादकीय वगैरे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी असतात. त्याचा समाजावर परिणाम होतो. त्यामुळे या पदावरील लोकांनी भान ठेवलं पाहिजे. कारण बातमी आणि अग्रलेखाने समाजवर परिणाम होत असतो, असं दरेकर यांनी सांगितलं.
 
शाईफेकीचं कृत्य अयोग्य : फडणवीस
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केलं आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे कृत्य चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. या घटनेबाबत भाजपच्या दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्रं असतं. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
कुबेरांनी लिहिलेला वादग्रस्त मजकूर
गिरीश कुबेर लिहतात, छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, तसेच ”छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांनाही ठार केले, त्यातील काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मडळातील होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली चांगली फळी नष्ट झाली. याची किंमत नंतर छत्रपती संभाजी महाराजांना मोजावी लागली, असंही ते लिहतात. या मजकूरावरून कुबेर यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.