सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (21:27 IST)

मनसे राज ठाकरें यांचा औरंगाबाद सभेला परवानगी मिळाली पण.....

राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेसाठ काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. सभेसाठी या अटींचं पालन करावं लागणार आहे. अशा 16 अटी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या आहेत.
 
सभेसाठी मुख्य अट म्हणजे, "सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा वर्ण प्रदेश, जन्मस्थान, धर्म इ किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी."
 
ध्वनी प्रदूषण होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, सामाजिक वातावरण बिघडणार नाही. सामाजिक सलोखा बिघ़डेल असं वर्तन होणार नाही याची खबरदारी सभेदरम्यान घ्यावी लागणार आहे.औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या अटी
 
सर्व अटी नागरिकांना कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असल्याचे या रवानगीत म्हटले आहे. या सभेसाठी 15 हजार लोकांनाच बोलावता येईल, वाहतूक नियमांचे पालन करावे लागेल. आक्षेपार्ह घोषणा देता येणार नाही. शस्त्रं, स्फोटक पदार्थ आणता येणार नाहीत, त्यांचं प्रदर्शन करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या अटीत म्हटलं आहे.
 
योगी आदित्यनाथांचे आभार
धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
 
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय की, "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबदद्ल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी.
 
"महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना."
 
औरंगाबादमध्ये 1 तारखेला सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 मे 2022 रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केलं. ही सभा औरंगाबादमधील सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र, अजूनही पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आलेली नव्हती. अखेर आज ती मिळाली आहे.
 
ही परवानगी नसली तरी मनसे कार्यकर्त्यांकडून या मैदानावर सभेची तयारी केली जात आहे. जर ही परवानगी आम्हाला मिळाली नाही, तर आम्ही कोर्टात जाऊ, असं मनसेच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं.
 
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं होतं की, "राज ठाकरेंच्या सभेबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त दोन दिवसात निर्णय घेतील."
 
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठीचा टिझर मनसे कार्यकर्त्यांकडून रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर' असा करण्यात आला आहे.
 
औरंगाबादचं नामकरण 'संभाजीनगर' करावं, अशी बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा मागणी याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
औरंगाबादमध्ये जमावबंदी
औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरात 13 दिवसांची जमावबंदी लागू केलेली आहे.
 
या आदेशात नमूद केल्यानुसार, "आगामी काळात मनसे पक्षाकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अनेक संघटनांचा त्याला विरोध आहे. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षण, कामगार मागण्या यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
 
औरंगाबाद हे एक संवेदनशील शहर असून तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास, मोर्चा काढण्यास, धरणे धरण्यास, घोषणाबाजी करण्यास आणि मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात येत आहे. "
 
भोंगे हा सामाजिक विषय
राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं. "हा धार्मिक विषय आहे असं लोकांना वाटत आहे. पण मी आधीही सांगितलं आहे की, हा सामाजिक विषय आहे. केवळ हिंदुंना त्रास होतोय असं नाही तर भोंग्यांचा त्रास मुस्लीम समुदायालाही होत आहे", असं राज ठाकरे म्हणाले होते.
 
मनसेने पुण्यात लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख 'हिंदुजननायक' असा करण्यात आला आहे. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती झाली.
 
राज ठाकरे यांनी या सभेत तलवार उंचावून पुन्हा म्यान केली होती. परंतु आता भारतीय हत्यार कायद्यान्वये त्यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
 
3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही असं राज ठाकरे ठाण्यात म्हणाले होते.