शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (17:19 IST)

आनंदाची बातमी : राज्यात मान्सूनचे संकेत

पुणे- शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून काहीसा मंदावला आहे परंतु आता सुमारे दोन आठवड्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत.
 
पुढील तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. येत्या गुरूवारपासून राज्यात सर्वत्र पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून येत्या रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याचे संकेतही भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.
 
आज पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असून कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 
 
दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. मात्र आता 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, या अंदाजामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.