शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (10:14 IST)

मान्सून लवकरच महाराष्ट्रात, दोन-तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता

केरळमध्ये गुरुवारी दक्षिण-पश्चिम मान्सूनने पावसाळ्याची सुरूवात केली. मात्र, गेल्या सहा वर्षांत मान्सून उशीरा येण्याची ही तिसरी वेळ आहे.
 
केरळमध्ये दार ठोठावल्यानंतर मान्सून आज तामिळनाडू, पुडुचेरी आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पोहोचेल. भारत हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या म्हणण्यानुसार केरळमधील बहुतांश भागात तसेच लक्षद्वीपच्या बर्‍याच भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रात पोहोचण्यास दोन किंवा तीन दिवस लागू शकतात, असेही विभागाने सांगितले आहे. आज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांसह देशाच्या बर्‍याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान विभाग, मुंबईचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांच्यानुसार मान्सून हळूहळू अरबी समुद्राकडे वाटचाल करत आहे, त्यानंतर काही दिवसांत तो महाराष्ट्रात प्रवेश करू शकेल. महाराष्ट्रात पावसाळ्याचे आगमन होताच ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. याबरोबरच येत्या दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यातील काही भागात मान्सून सक्रिय होईल. ज्यामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी पावसाची शक्यता
तसेच, हवामान खात्यानुसार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. त्याशिवाय गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व राजस्थान, गुजरात येथे जोरदार वारा असण्याची शक्यता आहे.
 
आयएमडीनुसार यावेळी पावसाळ्यात देशातील बर्‍याच भागात सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर त्यांचे म्हणणे आहे की यावेळी दोन दिवसांच्या विलंबाने दक्षिण-पश्चिम मान्सूनने दरवाजे ठोठावले आहेत. आयएमडी प्रमाणे केरळच्या दक्षिण-पश्चिममध्ये मान्सूनची सुरुवात साधारणपणे 1 जूनपासून सुरू होते परंतु यावेळी 3 जूनला दोन दिवसांच्या विलंबाने आगमन झाले.