शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (09:18 IST)

यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस, राज्याची स्थिती जाणून घ्या

पुणे- देशभरात जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीच्या १०१ टक्के  पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. हवामान विभागाने मोसमी पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला.
 
हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाच्या पहिल्या अंदाजातही सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०१ टक्के  पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात ४ टक्क्यांपर्यंत वाढ-घट होऊ शकते. असं असलं तरी राज्यात दुष्काळ पडण्याची शक्यता केवळ आठ टक्के एवढी आहे.
 
राज्याची स्थिती 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील अंदाजेप्रमाणे  यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे. 
 
दक्षिणेच्या राज्यातील काही भागांमध्ये, उत्तरेच्या आणि ईशान्येकडील राज्यांतील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तरी देशभरातील बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
 
प्रशांत महासागरात सध्या 'ला निनो' स्थिती तयार झाल्यामुळे मान्सूनला चांगलाच फायदा होत आहे. परिणामी पावसाळाच्या उतर्धात देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.