मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2023 (21:29 IST)

केरळमध्ये उशीराने पोहोचणार मान्सून, ७ जूनपर्यंत आगमनाची शक्यता

monsoon
केरळमध्ये मान्सूनचे आगमन तीन ते चार दिवसांनी लांबल्याने राज्यात पावसाचेही आगमनही उशिरा होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सोमवारी जाहीर केले. यापुर्वी विभागाने मान्सून 4 जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता तो काही वातावरणीय बदलामुळे ते 7 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असे सांगण्यात येत आहे.
 
आज सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, हवामान विभागाने म्हटले आहे कि, “दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये वृद्धी झाल्यामुळे परिस्थिती मान्सुला अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे. 4 जून रोजी ते एका टप्प्यावर पोहोचले असून सरासरी समुद्रसपाटीपासून ते २.१ किमी.ने वाहत आहेत.
 
पुढे आपल्या निवेदनात, “आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून सुरू होण्याऱ्या या अनुकूल परिस्थितीमध्ये पुढील ३-४ दिवसांत अजूनही सुधारणा होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे हवामान एजन्सीने सांगितले आहे. या हवामान बदलाच्या परिस्थितीकडे हवामान विभाग लक्ष ठेऊन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यापुर्वी दक्षिणेकडील राज्यात 2022 मध्ये 29 मे, 2021 मध्ये 3 जून आणि 2020 मध्ये 1 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले असल्याच्या नोंदीही हवामान खात्याने कळवल्या आहेत. तसेच देशाच्या इतर भागात मान्सून कधी सुरू होईल याचा खुलासा हवामान खात्याने अजूनही केलेला नाही.

Edited By-Ratnadeep Ranshoor