गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (07:28 IST)

पावसाच्या आगमनाबाबत हवामान विभागाने दिली ही माहिती

गेल्या २० ते २५ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची तीव्र प्रतीक्षा केली जात आहे. यंदा पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज देण्यात आल्याने शेतकऱ्यांसह सर्वच कामाला लागले. पेरणीसाठी शेती सज्ज असतानाही आता पावसाची तीव्र ओढ बळीराजाला लागली आहे. आज येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता जूनची १९ तारीख उजाडली आहे. तरीही पाऊस न आल्याने राज्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. आता हवामान विभागाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
 
नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन जवळपास १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या दहा दिवसात राज्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाबी. मात्र, आता मान्सूनने गती घेतली आहे. त्यामुळेच नैऋत्य मान्सूनने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकला आहे. दरवेळी उत्तर भारतात जाण्यापूर्वी मान्सून हा महाराष्ट्राला चिंब करीत असतो. यंदा मात्र, मान्सूनने उत्तर भारत गाठला असून अद्यापही महाराष्ट्र कोरडाच आहे. राज्याला मोठ्या पावसाची गरज असून ती नेमकी कधी पूर्ण होणार याबाबत अद्यापही हवामान विभागाने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.