चिंताजनक : राज्यात एचआयव्हीचे प्रमाण जास्त
गेल्या तीन वर्षांत देशात एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र त्याचबरोबर काही राज्ये एचआयव्ही संसर्गाची नवी ठिकाणे म्हणून समोर आली असून महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याचे रोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी संसदेत सांगितले आहे.
ते म्हणाले, की इतर राज्यात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असून मेघालय, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तीन वर्षांत एकूण एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २,००,४६५ जणांना एचआयव्ही बाधा झाली. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १,९३,१९५ होते. तर २०१७-१८ मध्ये ते १,९०,७६३ झाले. तीन वर्षांत महाराष्ट्रात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असून तेथे २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार २८,०३० रुग्ण आहेत. मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण तेथे गर्भवती महिलांमध्ये व जोखमीच्या गटात (वेश्या व इतर) एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. देशभरात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असताना या तीन राज्यांत मात्र एचआयव्हीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.