शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:05 IST)

जे.जे. रुग्णालयातील १३० हून अधिक सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकार्‍यांनी पदाचे राजीनामे दिले

रुग्णालय प्रशासनाचा व सरकारचा निषेध करत जे.जे. रुग्णालयातील १३० हून अधिक सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकार्‍यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक पदाचे राजीनामे दिले आहेत. याचा फटका वैद्यकीय महाविद्यालयात एमडी किंवा एमएस करणार्‍या साधारणपणे २०० विद्यार्थी डॉक्टरांना बसणार आहे.
 
संपूर्ण जगात कोविडचे थैमान सुरू असून आता तिसरी लाटदेखील आली आहे. या सर्व संकटामध्ये आपल्या कुटुंबाची, जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय शिक्षक सेवा देत आहेत. त्याकरिता त्यांना ‘कोविड योद्धे’ म्हणून वारंवार गौरविण्यातही आले. मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे. रुग्णालयाच्या अखत्यारीत येणार्‍या सेंट जॉर्ज, जी.टी. तसेच कामा रुग्णालयात काम करताना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. मात्र असे असतानाही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वर्षानुवर्षे वैद्यकीय महाविद्यालयात काम करूनही फक्त आश्वासन देऊन सरकार वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सहाय्यक प्राध्यापकांनी आंदोलनाचे पाहिले पाऊल म्हणून जे. जे रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा १३० हून अधिक शिक्षकांनी अधिष्ठात्यांकडे सुपूर्द केला. अशाप्रकारे राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांनीही राजीनामा दिला आहे.