गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:27 IST)

१५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Deepak Vasant Kesarkar
शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील 65 हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 15 लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी वरळीच्या मनपा शाळेतून तर 27 तारखेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांदा जि.प.शाळेतून श्री.केसरकर या अभियानाचा शुभारंभ करतील.
 
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी उपस्थित होते.
 
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, या अभियानात मातांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुलेंचा वारसा त्या खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच हे अभियान यशस्वी होत आहे. जागतिक स्तरावर हे सिद्ध झाले आहे की, वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा 80 टक्के विकास होतो. यासाठी बालशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच चांगली पिढी घडवायची असेल तर शिक्षणाबरोबरच मुलांचे संगोपन उत्तम होणेही गरजेचे आहे. या उद्देशाने 30 एप्रिल पर्यंत राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 
अभियानाच्या केंद्रस्थानी लाखो माता गट
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या त्यांच्या माता या अभियानाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीचा उपयोग करून माता गटांच्या मदतीने शालेय प्रवेशासाठी मुलांची तयारी करून घेतली जाणार आहे. मागील वर्षापासून शालेय शिक्षण विभागाने मातांची वाडी/ वस्ती निहाय छोटे-छोटे गट तयार करून त्यांना सतत मार्गदर्शन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर जवळपास 2.6 लाख माता-गटांची स्थापना केली गेली आहे. तेच या अभियानाला पुढे घेऊन जात आहेत.

या अभियानात अंगणवाडी सेविकांचे देखील मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी, या अभियानाच्या निमित्ताने बालकांच्या तयारीसाठी विकसित केलेले साहित्य माता गटांना एकाच वेळेत देता यावे, यासाठी राज्यातील सर्व 65 हजार शासकीय शाळांमध्ये शाळापूर्व तयारीचे पहिले मेळावे 23 ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दुसरे मेळावे जून महिन्यात घेण्यात येतील. असे शाळापूर्व तयारी मेळावे इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभर आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.
 
मागील वर्षी माता गटांच्या, शाळांच्या तसेच समाजाच्या भरघोस प्रतिसादामुळे या अभियानाला चांगले यश मिळालेले आहे. अभियानानंतर केलेल्या सर्वेक्षणात पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक तसेच भावनिक गुणवत्तेत सरासरी 40 टक्के प्रगती झालेली दिसली. यंदा यंत्रणा अधिक सज्ज असून मागील वर्षापेक्षाही जास्त प्रगती दिसेल, असा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.
 
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत व्यत्यय आला होता. त्या आव्हानात्मक परिस्थितीत लहान मुलांच्या शिक्षणात पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून चांगली भूमिका निभावली आहे. यासाठीच या अभियानात पालकांना सहभागी करून घेतले जात असल्याचे श्री.केसरकर म्हणाले.
 
‘लोकचळवळ उभी राहणे गरजेचे’
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुलांनी आनंदाने आणि तयारीनिशी शाळेत यावे, यासाठी ही एक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. मुलांचा विकास घडविण्यात शाळा आणि शिक्षक हे प्रमुख घटक आहेत. या कार्यात सर्वांना सोबत जोडणे गरजेचे आहे. हेच या अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. तथापि केवळ मेळाव्यापुरते किंवा एक-दोन महिन्यांपुरते हे अभियान न राहता आपल्या मुलांचे बालपण आणि त्यांच्या शालेय जीवनाची सुरूवात साजरा करण्याची एक चळवळ निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. या अभियानासाठी निर्मित केलेले साहित्य उत्तम आणि सहज-सुलभ आहे. यातील आयडिया कार्ड वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात बालकांच्या भावविश्वाचा, त्यांच्या अभिरूची आणि त्यांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या कृतींचा विचार केलेला आहे. अगदी ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील माता देखील त्या कृती सहजतेने बालकांकडून करून घेऊ शकणार आहेत. त्या कृती करताना आईला देखील आनंद मिळणार असल्याचे ते म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor