1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (08:27 IST)

MPSC चा गतिमान कारभार! पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड व गुणवत्ता यादी जाहीर

MPSC Selection and merit list announced within four hours after the physical test for the posts of police sub-inspector
मुंबई  – पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
 
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. ०२ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, दि. ०२ डिसेंबर, २०२२ रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.
 
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ ची घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेचा निकाल दि. ०९ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ चे आयोजन दि. ३० जुलै, २०२२ रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.
 
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब/निवेदने/पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor