शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (09:54 IST)

मुंबई महानगरपालिकेने मोबाइलवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष App विकसित केले

BMC
न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने मोबाइलवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष App विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या App चा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील Appमध्ये दिली आहे. प्रारंभी Android प्लॅटफॉर्मवर हे App वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदुषणाची तक्रार मांडण्यासाठीचे डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पर्यावरण विभागाला दिले होते. त्यानुसार पर्यावरण विभागाने नागरिकांच्या सहज वापरासाठीचे असे मोबाइल App तसेच संकेतस्थळावर (वेब पोर्टल) उपलब्ध करून दिले आहे. मोबाइल Appच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या भागातील तक्रारींची मांडणी करणे सहज शक्य आहे. तर महानगरपालिकेच्या विभाग पातळीवर या तक्रारींची दखल घेत तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली. लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवर देखील हे App उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
Edited by -Ratnadeep Ranshoor