गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (14:15 IST)

नगरपंचायत निकाल : पंकजा मुंडे, रोहित पवार, यशोमती ठाकूर यांनी गड राखले तर विश्वजित कदम आणि निलेश लंकेंना धक्का

राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या 45 जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागत आहेत.
 
बीडमधील आष्टी, पाटोदा आणि शिरुरमध्ये भाजपची सरशी झाली आहे. बीडच्या केजमध्ये काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 आणि जनविकास आघाडीला 6 जागा मिळाल्या आहेत.
 
या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले आहेत. लोकांनी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती दिली आहे. राज्यभरातील निकाल मी पाहतीये. लोकांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिल्याचं पाहायला मिळतंय.
 
बीडमध्ये ज्या नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आहे, असंही पंकजा यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.

अहमदनगरमधल्या कर्जतमध्ये आमदार रोहित पवारांचे एकहाती वर्चस्व दिसून आलं आहे. तिथं त्यांनी भाजपच्या राम शिंदेंना धक्का दिला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपनं फक्त 2 जागा जिंकल्या आहेत.
 
तिवसा नगरपंचायतीमध्ये सत्ता राखण्यात मंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. 17 जागांपैकी काँग्रेस 12 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्यात. वंचितला इथं एक जागा मिळाली आहे.
 
भातकुलीत राणा दांपत्याला यश
भातकुलीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची एकहाती सत्ता आलीय. तिथं राणा यांच्या पक्षाला 17 पैकी 9 जागा मिळाल्यात. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलंय.
 
भाजपला 2 तर शिवसेनेलाने 3 जागा मिळाल्यात. शिवाय 2 अपक्ष उमेदवारांनीसुद्धा इथं बाजी मारली आहे.
 
भातकुली नगर पंचायतीमध्ये यापूर्वीही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं वर्चस्व होतं.
 
दिंडोरीमध्ये काय आहे परिस्थिती?
दिंडोरी नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी शिवसेनेला 6 जागा मिळाल्या असून भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत.
 
शिवसेनेची 1 जागा अगोदर बिनविरोध झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जागा जिंकल्या असून काँग्रेस 2 जागांवर विजयी झाली आहे.
 
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजप नेत्या डॉ भारती पवार (दिंडोरी खासदार) आणि विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रचारातील सहभागामुळे ही नगरपंचायत लक्षवेधी होती.
 
कडेगाव नगरपंचायतीत विश्वजित कदमांना धक्का
कडेगाव नगरपंचायतीत निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
 
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची सत्ता भाजपाने या ठिकाणी उखडून टाकली आहे. अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे.
 
हा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसला 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.
 
निफाड आणि देवळा नगरपंचायत निकाल
निफाडला शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांची सरशी, तर राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का बसला आहे. मात्र या नगरपंचायतीत बहुमत कोणालाच मिळालं नाहीये.
 
निफाड नगरपंचायतीच्या सर्व 17 जागांचे निकाल जाहीर आहेत. शिवसेनेला 7, शहर विकास आघाडीला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, काँग्रेसला 1, बसपाला 1 आणि अपक्ष उमेदवाराला 1 जागेवर विजय मिळाला आहे.
 
देवळा नगरपंचायतीच्या 17 जागांचे निवडणूक निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपनं 15 जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत.
 
अकोल्यात पिचडांचं वर्चस्व कायम
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले नगरपंचायतीत माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी बाजी मारलीय. इथं भाजपला 17 पैकी 12 जागा मिळाल्यात. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 2 आणि काँग्रेसला एक जागा मिळालीय.
 
देहूगावमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
देहूगावच्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालीय. इथं राष्ट्रवादीला 14 तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. 2 ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
 
लंकेच्या हातून पारनेर गेलं?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायतीत 17 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर शिवसेनेला 6 जागा मिळाल्यात. भाजपला एक जागा मिळाली आहे. दोन प्रभागात शहर विकास आघाडीचे तर एक ठिकाणी अपक्ष निवडून आलाय.
 
इथं बहुमताचा आकडा 9 असल्याने शहर विकास आघाडीकडे सत्तेच्या चाव्या गेल्याची चर्चा आहे.
 
ओबीसी आरक्षणाविना पार पडलेली निवडणूक
राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी आणि 195 ग्रामपंचायतींमधील 209 जागांवर झालेल्या निवडणुकीचेही निकाल लागत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं 15 डिसेंबर 2021ला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठीचा आदेश दिला.
 
या आदेशानुसार नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित जागांसाठी काल (18 जानेवारी) मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झालं होतं.