नागपुर: भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली,व्हिडीओ मध्ये आत्महत्येचे कारण सांगितले
भाडेकरूच्या छळाला कंटाळून नागपुरातील एका घर मालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित घरमालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भाडेकरूकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून असं केल्याचा उल्लेख केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भाडेकरू आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय 46) असे मयत झालेल्याचे नाव आहे.मयत रिजवानी जरीपटका येथील कस्तुरबा नगर येथील रहिवासी होते .त्यांचा नाश्ता सेंटरचा व्यवसाय होता. मृत रिजवानीने काही वर्षांपूर्वी आरोपी राजेश उर्फ राजा नमोमल सेतियाला दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. ठरल्यानुसार आरोपी सेतिया मयत रिजवानी यांना घरभाडे देत नसायचा. भाडे मागितल्यावर आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
एवढेच नाही तर आरोपी राजेशचा भाऊ घराच्या मालक रिजवानीला वेगवेगळ्या विभागात तक्रार करून त्रास देत असे. सततच्या छळाला कंटाळून रिजवानीने आरोपीला सप्टेंबर 2019 मध्ये घर रिकामे करण्यास सांगितले. पण आरोपींनी घर सोडण्याऐवजी घर रिकामे करण्यासाठी घर मालकाकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपीच्या दबावाखाली घराच्या मालकाने त्याला 60 हजार रुपये दिले. पण आरोपी अधिक पैशांसाठी घर मालकाला त्रास देत होता.
आरोपींच्या सततच्या छळाला कंटाळून घर मालक रिजवानी यांनी 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी रिझवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आत्महत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केले आहे. यासोबतच आरोपीकडून दिल्या जाणाऱ्या छळाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यात एका वकिलाचाही समावेश आहे. या संदर्भात जरीपटका पोलीस ठाण्यात (Jaripatka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.