गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (09:24 IST)

नारायण राणे रायगड पोलिसांसमोर हजर झालेच नाहीत; कारण…

केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहू शकले नाहीत.मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राणे यांना काही दिवस पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राणे यांचे वकील संदेश चिकणे राणे यांच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्यालयात हजर झाले.त्यांनी पोलिसांना सांगितले की,राणे यांना बरे वाटत नसल्याने ते येऊ शकत नाहीत.
 
सकाळी, राणे यांच्या आगमनाच्या अपेक्षेने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. चिकणे यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती, कारण त्यांनी मी असतो तर मुख्यमंत्र्यांना कानाखाली चढवली असती,असं विधान केलं होतं.त्यांना मंगळवारी रात्री रायगडमधील महाड येथे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.न्यायालयाने राणे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना ३० ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी अलिबाग (रायगड) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.राणे यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात राजकीय वाद आणि निदर्शने झाली.