गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (08:10 IST)

नाशिक:खाद्यपदार्थात झुरळ टाकून मिठाई व्यावसायिकांना ठगणाऱ्या खंडणीखोराला अटक

arrest
मिठाईच्या दुकानात ग्राहक बनून जात खाद्यपदार्थात झुरळ व केस असल्याचे दाखवून त्याची वाच्यता न करण्यासाठी खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोराच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या.
अजय नामदेव ठाकूर (वय ४४, कामटवाडे) असे या सराईताचे नाव असून तब्बल दहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.

खंडणी विरोधी पथकातील मंगेश जगझाप आणि भूषण सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरून आज गुरुवारी (ता.१) पोलिसांनी पवननगरला श्रीनिवास हॉटेलजवळ ही कारवाई करीत संशयित अजय नामदेव ठाकूर (४४, सरस्वती विद्यालयजवळ, विखे पाटील स्कूल, कामटवाडा) याच्या मुसक्या आवळल्या.

रतन पुनाजी चैधरी (रा. लवाटेनगर, सिडको) यांनी १३ सप्टेंबर २०२२ ला अजय ठाकूर विरोधात सरकारवाडा पोलिसांत तक्रार केली होती. १९ ते २० ऑगस्टदरम्यान ठाकूर याने विद्या विकास सर्कल येथील सागर स्वीट दुकानातून बासुंदी घेऊन त्यात झुरळ टाकून व्हिडिओ तयार केला व चौधरी यांना तो व्हायरल करण्याची तसेच अन्न भेसळ प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी उकळली.

गंगापूर पोलीस ठाण्यात मनीष मेघराज चौधरी (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड, नाशिक) यांच्या सावरकरनगरातील मधुर स्वीट्समध्ये अजय ठाकूरने ६ सप्टेंबरला असाच प्रकार करीत, झुरळ असल्याचे सांगून दुकान मॅनेजर पुखराज चैधरी यांच्या मोबाईलवर, व्हॉट्स अॅपवर फोन कॉल व मेसेज करून व्हिडिओ पाठविले. यासह दुकानाची बदनामी टाळण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागितली होती.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor