नाशिक : वडिलांना बायको मुलांनी संपवले
लग्न म्हटलं की मानापमान आणि रुसवा फुगवा आलाच. मग अशावेळी किरकोळ वाद, रुसवा सोडविण्यासाठी विनवण्या करणं हे आलंच.
मात्र नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुतणीच्या लग्नात आले नाही, म्हणून वडिलांनी जाब विचारला. यावरून थेट बायको आणि मुलांनी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील कुंदलगाव परिसरात ही घटना घडली आहे. येथील पवार कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. लग्नघरी बरीच गडबड सुरु होती. लग्नाचा दिवस उजाडला. पुतणीचे लग्न म्हणून काका लग्नाची तयारी करत होते. मात्र पुतणीच्या लग्नात काकू आणि चुलत भाऊ आलेच नाहीत. लग्नही पार पडले. लग्नातील सर्वच जण काकांना कुटुंबीय आले का नाही? म्हणून विचारत होते.
लग्न झाल्यावर मयत पुनमचंद पवार हे घरी गेले. लग्नात का आले नाही? म्हणून बायको मुलांना जाब विचारला. याचा राग येऊन बायकोसह मुलांनी पुनमचंद यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पुनमचंद पवार यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे घरी वारंवार भांडण होत असायचं. पवार हे कुटुंबीयांना शिवीगाळ करत असल्यानं कुटुंबीय वैतागले होते. अशातच कुंदलगाव येथे पवार कुटुंबीयांच्या घरी 18 मार्च रोजी लग्न सोहळा होता. पुतणीचे लग्न असल्याने पुनमचंद पवार हे सकाळपासून लग्न घरी तयारी करत होते.
मात्र त्यांच्या घरचे बायको आणि मुलं हे काही लग्नात आले नाहीत. पाहुणे मंडळी अनेकजण पुनमचंद यांना विचारणा करत होते. लग्न सोहळा आटोपला. त्यानंतर पुनमचंद हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी गेले. यानंतर बायको मुलांमध्ये वाद झाला. या वादात बायको आणि मुलांनी पुनमचंद यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
घटना घडल्यानंतर संबंधित मुलांनी चुलते भाऊराव यांना बोलावले. भाऊराव यांनी पुनमचंद यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पुनमचंद यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी सुनीतासह दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor