शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (08:29 IST)

नाशिक: विवाहितेवर सामूहिक अत्याचार; दगडाने ठेचून केली हत्या

murder
खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली आहे. संशयितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मयत महिलेच्या नातलगासह ग्रामस्थांनी घोटी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता.
 
एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यानी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.
 
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या झाल्याने गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून घोटी पोलीस ठाण्याबाहेर गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला आहे.
 
या प्रकरणी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
 
महिलेचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा संतप्त गावकऱ्यां घेतला असून घोटी पोलीस ठाण्यातच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीच्या पाण्यात आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताबाई शरद चौधरी या नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी त्यांच्यासोबत झटापटी करून त्यांना खोल दरीत नेले. तेथे अत्याचार करून नंतर तिचा खून केला आहे. बराचवेळ झाला तरी मुक्ताबाई अजुन घरी का परतली नाही, हे पाहण्यासाठी घरचे काहीजण खदाणीकडे गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली.
 
या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे एक इसम घटना स्थळी मिळुन आला. नागरिकांनी त्याला पकडुन घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत तीन ते चार संशयित असल्याची माहिती पुढे आहे. बाकी संशयित आरोपी फरार झाले आहेत. आमदार हिरामण खोसकर, काँग्रेसचे अ‍ॅड. संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य उदय जाधव, कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी यांनी पोलीस ठाण्यावर जाऊन आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
 
खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहाच्या परीसरात रोजच अनेक मद्यपी दारु पिण्यासाठी बसत असल्याने हा मद्यपींचा अड्डा बनला आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. याच विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला.
 
या घटनेनंतर सायंकाळी हजारो नागरिकांच्या जमावाने घोटी पोलीस ठाण्यात घेराव घातला. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात दाखल होत संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. तसेच या ठीकाणी गावठी दारूचा धंदा सुरू होता. हा दारुचा धंदा बंद करावा यासाठी खंबाळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी केली होती मात्र हा धंदा बंद झाला नाही यामुळेच ही घटना घडल्याचे जमावाने सांगितले. तसेच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप खेडकर यांची तातडीने निलंबित करण्यात यावे किंवा बदली करण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त जमावाने केली.
 
यावेळी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षिका माधुरी कांगणे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच दोन तीन दिवसात खेडकर यांची बदली करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
Edited By - Ratnadeep ranshoor