नाशिक : हॅलो 112.. मद्यधुंद अवस्थेत केला पोलिसांना फोन,तक्रारदारावर गुन्हा दाखल
नाशिक : नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी, अडचणीच्या काळात मदतीसाठी राज्यभरात डायल 112 दिला आहे. या कॉलच्या माध्यमातून अडचणीच्या काळात 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही मिनिटामध्ये पोलिसानांची मदत मिळते.
मात्र नांदगाव तालुक्यातील एका नागरिकाने डायल 112 नंबर फिरवला, आणि हॅल्लो..इथे चोरटी रेती वाळू वाहतूक सुरु आहे. लवकर या..असे म्हणत पोलीस हेल्पलाईन नंबर 112 ला कॉल केला खरा, मात्र तिथे पोलीस पोहोचल्यानंतर प्रत्यक्षात काहीच दिसले नाही, उलट तक्रारदार हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून तक्रारदारावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्यातील नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी. या उद्देशाने 112 या डायल ही योजना सुरु करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीचा सर्व तक्रारी कॉल प्रथम जिल्हा पोलीस मुख्यालयाला जातो.
हे ही वाचा: नाशिक: सिडकोत 54 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांचे पाऊल
तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित तालुका पोलीस ठाण्याला पाठवला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तिथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठवली जाते.
मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. सद्यस्थितीत या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका नागरिकाने पोलिसांची फिरकी घेतल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार अमोल इंदरचंद शर्मा या तक्रारदारास शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी कॉल केला असता तक्रारदार हा सरकारी वाहनाजवळ मद्यधुंद अवस्थेत पोहोचला. पोलिसांनी त्यास तुम्ही डायल 112 ला कॉल केला होता का? अशी विचारणा केली. तसेच कुठे चोरटी रेती वाहतूक सुरु आहे याबाबत विचारणा केली. मात्र तक्रारदार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
नागरिकांवर गुन्हा दाखल:
दरम्यान, पोलिसांनी तक्रारीची परिसरात खात्री केली असता असा कोणताही प्रकार झाले नसल्याचे समजले. दरम्यान, तक्रारदाराने डायल 112 ला केलेला कॉल हा दारुच्या नशेत केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार खोटे कॉल करुन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करुन शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचा दुरुपयोग केला म्हणून त्याच्यावर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. खरंतर आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी 112 नंबर हा डायल करुन पोलिसांची मदत मिळवणे हा या नंबरचा उद्देश आहे. मात्र अगदीच क्षुल्लक कारणासाठी सुविधा आहे, म्हणून 112 कॉल करायचा अन् पोलिसांना वेठीस धरायचे, असा सर्रास उद्योग सुरु असल्याने आणि पोलिसांची विनाकारण धावपळ होत असल्याने अखेर पोलिसांनीच फिर्यादी बनून तक्रारदारावर गुन्हा दखल केला.
Edited By - Ratnadeep Ranshoor