गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (23:57 IST)

नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार

Nashik Municipal Corporation elections
नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता  मनसे आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. 
 
मनसे आगामी महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून राजकीय दौरे करत आहेत. दरम्यान, राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. तर अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आज नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं देशपांडे म्हणाले.
 
राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. पाहणी करत असताना काही ठिकाणी या प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे मनसेच्या काळातील या प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करण्यात  यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांना केली आहे.