नाशिक :अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदा, टोमॅटो फेकले (फोटो)
नाशिक :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यामध्ये एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून टोमॅटो आणि कांदा फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सरकारी यंत्रणांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने टोमॅटो व कांदा फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील शेतीमालाच्या भावाचा प्रश्न अतिशय ज्वलंत बनला आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. टोमॅटोचे भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. यासह जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या फ्लॉवर, पालेभाज्या यासह अन्य भाज्यांचे दर सातत्याने कोसळत असल्यामुळे नाशिक जिल्ह्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचाच फटका हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला.
अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आले असताना ओझर विमानतळावर त्यांचे सकाळी साडेदहा वाजता आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कळवणच्या दिशेने जात असताना सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी या गावातील चौफुलीजवळ अचानक शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष हिरे, तसेच श्याम हिरे या दोन कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून एकाने टोमॅटो व एकाने कांदा फेकून शेतकऱ्यांचा असणारा राग व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे,विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून कांदा व टोमॅटोच्या कोसळलेल्या भावा संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावी, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध नोंदविला. मात्र, वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला.
Edited By - Ratnadeep Ranshoor