शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (09:07 IST)

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानीमित्त नाशिकरोड, जेलरोड भाजीमार्केट दोन दिवस बंद

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौ-यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. नाशिकरोडवर उड्डाणपुलाखालील भाजी बाजार तसेच जेलरोडचा भाजीबाजार उद्या गुरूवारी (ता.११) आणि शुक्रवारी (ता.१२) दोन दिवस बंद राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या बाजारातील विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. भाजीबाजार विक्रेत्यांशी चर्चा केली असता त्यांनीही बाजार दोन दिवस बंद राहणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
 
नाशिक रोडला सर्वात मोठा भाजीबाजार हा वीर सावरकर उड्डाण पुलाखाली अनेक वर्षांपासून भरत आहे. त्यावर अवलंबून असलेल्या विक्रेते, फेरीवाला यांची संख्या तीनशेच्या घरात आहे. मोदींच्या दौ-यामुळे त्यांना दोन दिवस येथे व्यवसाय करता येणार नाही. मूळात हा बाजार फेरीवाले झोनमध्ये नसल्याने ही त्यांना परवानगी नाही. हा वाद कोर्टात दाखल असल्याचे समजते. उपाययोजना करण्यात आली आहे.
 
या बाजारासह शिवाजी पुतळा परिसरातील भाजीविक्रेते, फेरीवाल्यांना विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या रस्त्याची जागा दोन दिवसासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेलरोडच्या  प्रेस समोरही मोठा बाजार भरतो. या विक्रेत्यांना केला हायस्कूलमागील मैदानावर बसण्यास सांगण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांनी दिली. फेरीवाला झोनमध्ये व्यवसाय करणा-यांना मात्र धोका नाही. नाशिक रोड अग्नीशमन दलालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
या दलाने दुभाजक व पुतळा स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. नाशिक रोडचा छत्रपती शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा, बिटको चौकातील कामगार व विद्यार्थ्यांचे शिल्प आगीचा बंब आणून स्वच्छ करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत तपोवनात राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. त्यासाठी देशभरातून युवक येणार आहेत.