गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (21:09 IST)

नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, दोन संशयितांनी अतुल यांना जून २०२२ ते मे २०२३ या कालावधीत गंडा घातला. दोन संशयितांनी अतुल यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यास प्रोत्साहित केले होते. जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी अतुल यांच्याकडून ३ कोटी ५ लाख ११ हजार १०० रुपये घेतले. मात्र पैसे किंवा नफाही दोघांनी परत केला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल यांनी दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
 
दरम्यान, संशयित तरुणी पूजा  इन्स्टाग्रामवर रिल्स बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध आहे.  शेअर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांकडून पूजा भोईरला ताब्यात घेतले आहे. गुरुवारपर्यंत पूजा भोईर पोलिसांच्या ताब्यात असून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी ठाणे येथे रवाना झाले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor