1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (20:11 IST)

नाशिक : कसारा घाटात अद्ययावत बोगदा उभारणार, ९८ रेल्वेगाड्यांच्या प्रवासाचा वेळ वाचणार

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग आणि मुंबईहून देशभरात जाणार्‍या ९८ रेल्वेगाड्यांच्या प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी कसारा घाटात अद्ययावत बोगदा उभारण्याच्या प्रस्तावास गती यासाठी आपण सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिला.
 
नाशिक-पुणे लोहमार्गासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर मार्ग निघेपर्यंत न थांबता रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच कसारा घाटात अद्ययावत बोगदा उभारण्याच्या प्रस्तावास गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी मंत्री वैष्णव यांच्याकडे केली. त्यावर मंत्री वैष्णव यांनी ग्वाही दिली. नाशिक-पुणे या प्रस्तावित लोहमार्गाला काही वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली असून, यासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खा. गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक सर्व मान्यता मिळालेल्या आहेत.
 
भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात असून, डीपीआरमध्ये काही किरकोळ त्रुटी आहेत. तसेच, रोज ९८ रेल्वेगाड्या मुंबई येथून देशभरासाठी धावत असतात. घाट परिसरातील बोगद्यांमधून जाण्यासाठी रेल्वेगाड्यांना बॅकर लावावे लागते. त्यामुळे इगतपुरी ते कसारा अंतर कापण्यासाठी सर्वच गाड्यांना उशीर होतो. रेल्वे गाड्याचा आणि प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी अद्ययावत बोगदा उभारण्याचा प्रस्ताव खा. गोडसे यांनी वर्षभरापूर्वी रेल्वे मंत्रालयाला दिलेला आहे.
 
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.११) खा. गोडसे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली. प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्ग आणि कसारा घाटात अद्ययावत बोगदा लवकरात लवकर उभारणी करणे किती गरजेचे आहे, हे खा. गोडसेंनी नामदार वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, दोन्ही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी आग्रही मागणीही खा. गोडसे यांनी मंत्री वैष्णव यांच्याकडे केली. नाशिक-पुणे या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, काही महिन्यांत डीपीआरमधील किरकोळ त्रुटी दूर करून लगेचच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची ग्वाही यावेळी ना. अश्विनी वैष्णव यांनी खा. गोडसे यांना दिली.

Edited By - Ratnadeep Ranshoor