शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:18 IST)

पैशांसाठी अपहरण केलेल्या नाशिकच्या तरुणाची कल्याणमध्ये सुटका

नाशिक शहरातील जत्रा हॉटेल ते नांदुरनाका लिंकरोडवर पैशांसाठी तरुणाचे अपहरण करणार्‍या तिघांच्या नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पथकाने संबंधित तरुणाची सुखरुप सुटका कारमध्ये बसलेल्या तिघांना कल्याण फाटा, कोणगाव येथील जय मल्हार हॉटेल (जि.ठाणे) येथे अटक केली. पथकाने त्यांच्या ताब्यातून कार, चार मोबाईल असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जगन्नाथ विठ्ठल सदगीर (वय ३९, रा.सिन्नर, जि.नाशिक), सिलवेटर लुईस बागुल (२२, रा. चेहडी शिव, नाशिकरोड, नाशिक), भरत पोपट गिते (३६, रा.चेहड शिव, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.१७) रवींद्र पंढरीनाथ सोनवणे (वय ४६) यांचे अनोळखी व्यक्तींनी आर्थिक व्यवहाराच्या कारणातून कारमध्ये बसवून अपहरण केले. याप्रकरणी उज्ज्वला रवींद्र सोनवणे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच आडगाव पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. रवींद्र सोनवणेंसह संशयित कल्याण फाटा, कोणगाव येथील जय मल्हार हॉटेल (जि.ठाणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पथकास संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. त्यानुसार पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला. पथकास संशयित सोनवणेंसह कारमध्ये बसलेले दिसले.
 
सुरुवातीला पथकाने सोनवणेंची सुखरुप सुटका केली. त्यानंतर तिघा संशयितांना ताब्यात घेतले. पथकाने तिघांना अपहरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने तिघांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात पुन्हा चौकशी केली. सोनवणेंचे पैशासाठी जत्रा हॉटेल ते नांदुरनाका लिंकरोडवरील हॉटेल प्रसादम समोरुन कार (एमएच १५-डीएस ५३५३)मध्ये बसवून अपहरण केल्याचे तिघांनी सांगितले. पथकाने पुढील तपासासाठी तिघांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.