गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (16:00 IST)

नोटा छपाई राहणार बंद : आयएसपी व सीएनपी प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

महाराष्ट्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘ ब्रेक द चेन ’ अंतर्गत पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कडक कडक निर्बंध लावून संचारबंदी जाहीर केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सरकारची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय हे दोन्ही प्रेस ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रेस प्रशासनाने घेतला आहे.
 
नाशिकरोड येथे या दोन्ही प्रेसमधील कामगारांमध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला होता त्या पार्श्वभूमीवर या वर्षी कामगारांच्या आरोग्याची काळजी म्हणून  ब्रेक द चेन अंतर्गत हे प्रेस बंद ठेवावे अशी मागणी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दोनही प्रेसचे चिफ जनरल मॅनेजर यांच्यासोबत चर्चा केली.त्यानंतर प्रशासनाने हे प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
भारत प्रतिभूती मुद्रणालयात सरकारी बँकांचे धनादेश,सरकारी मुद्रांक, पारपत्र, एक्ससाईझ सील ,टपाल तिकिटे छापली जातात. चलार्थ पत्र मुद्रणालयात दहा रुपयांपासून पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई होते.सध्या या प्रेस मध्ये वीस,पन्नास,शंभर व पाचशे रुपयांच्या नोटा छापून तयार आहेत. जर रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांसाठी सूचना जारी केली तर ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. आयएसपी प्रेस मध्ये परराज्यांचे एक्ससाईझ सीलचे काम सुरु आहे ते सुट्टीच्या कालावधीत पूर्ण करता येईल.
 
दोन्ही प्रेस जरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला या प्रेस मधील औद्योगिक सुरक्षादल,अग्निशमन दल,वैद्यकीय सेवा. वाहतूक,वीजगृहे व पाणीपुरवठा आदी सेवा सुरूच राहणार आहे. ३० तारखे पर्यंत हे दोन्ही प्रेस जरी बंद ठेवण्याचा निर्णय झाला असला  तरी जर प्रशासनाने तातडीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यास त्यांना हजर राहावे लागणार आहे असे हि सांगण्यात आले आहे.बंद च्या काळात प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी घरीच राहून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन ही प्रेस प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.
 
१ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अशी  प्रेसला सुट्टी आहे. तर २ मे रोजी रविवार असल्याने हे दोन्ही प्रेसचे कामकाज १७ दिवस बंद  राहणार आहे.