पोलीस उपमहानिरीक्षक व तुरुंग अधिक्षकांच्या बंगल्यात घुसून थेट चंदनाची झाडे चोरणारा ‘पुष्पा’ पोलिसांच्या ताब्यात
नाशिक परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक व तुरुंग अधिक्षकांच्या बंगल्यात घुसून थेट चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या सराईताला नाशिक गुन्हेशाखेच्या युनिट एकाने जालन्यातून पकडले आहे. जावेद खान अजीज खान पठाण असे अटक केलेल्याचे नाव आहे.
या सराईताला पकडून आणतांना त्याच्या नातलगांसह नागरिकांनी त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करुन पोलीस कारवाईला विरोध करत गोंधळ घातल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, पथकाने जीव धोक्यात घालून त्याला ताब्यात घेत नाशिकला आणले आहे.
दरम्यान युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना नाशिकमध्ये चंदनचोरी करणारे चोरटे जालन्यातील कठोरा बाजार भागात वास्तव्यास असल्याची माहिती कळाली होती. त्यानुसार पथक नियाेजनानुसार जालन्यासाठी रवाना करण्यात आले हाेते व या संशयिताला पकडण्यात पथकाला यश मिळाले आहे. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षा भेदून चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरून नेली होती.
यानंतर चार दिवसांनी चोरट्यांनी परिक्षेत्राचे पोलीसउपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गडकरी चौकातील गोदावरी बंगल्याच्या आवारातून १२ हजार रुपयांचे चंदनाचे झाड तोडून चोरून नेले. या बंगल्यावरील सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड चोरून नेल्याचे समोर आले होते. तर सातपूर येथील शासकीय आयटीआय जवळील पोस्ट कार्यालयाच्या आवारातूनही चोरट्याने चंदनाचे झाड चोरून नेले हाेते.
त्या त्या पोलिस ठाण्यांकडून तपास सुरु असताना युनिट एककडून समांतर तपास सुरु असताना त्यांना चंदनचाेर जालन्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कठोरा बाजार भागात सापळा रचुन जावेदखान या संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.