रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (10:52 IST)

'नथुरामजी यांनी सांगितलं होतं की गांधीजींनी हे राम म्हटलंच नव्हतं' - गुणरत्न सदावर्ते

gunratna sadavarte
एसटी आंदोलनात आघाडीवर असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी (9 मे) त्यांच्या नवीन एसटी कर्मचारी संघटनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नावाचा उल्लेख 'गोडसेजी' असा केला.
 
'एसटी कष्टकरी जनसंघ' या नवीन एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यावेळी त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या.
 
ते म्हणाले, "गांधीजींनी शेवटच्या क्षणी श्वास सोडताना 'हे राम' म्हटलं असं इतिहासात लिहिलं आहे. पण नथुराम 'गोडसेजी' यांची न्यायालयात ट्रायल झाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की गांधीजींनी कधीही 'हे राम' म्हटलं नव्हतं."
 
ते पुढे म्हणाले, "गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून केला जात आहे. गेल्या 70 वर्षांत कष्टकरी समाजासाठी कोणतही ठोस काम झालेलं नाही. त्यांना न्याय मिळालेला नाही. यापुढे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू. त्यांना न्याय देण्यासाठी लढू. मातृभूमीसाठी आणि मानवतावाद यातून कष्टकरी कामगारांचा विकास ही आमची भूमिका आहे."
 
"राम जन्मभूमीचे आम्ही वकील होतो. न्यायालयात आम्ही यासाठी लढलो. प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन आम्ही यापुढे लढणार," असंही ते म्हणाले.
 
गुणरत्न सदावर्ते यांनी या संघटनेची घोषणा करत राजकारणात प्रवेश केल्याचं दिसतं. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका किंवा राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कामगार उतरेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.