सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (22:26 IST)

नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची एसआयटी चौकशी कऱण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. चौकशी सुरु असून गुन्हा दाखल झाल्यास योग्य कारवाई करु असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींनुसार गुन्हा दाखल करुन योग्य कारवाई करु असे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एनसीबी कारवाईवरील आरोपांची दखल घेतली आहे. बऱ्याच लोकांनी तक्रार केली आहे. याची पोलिसांकडून चोकशी सुरु करण्यात येत आहे. तपास करुन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन गृमंत्र्यांनी दिलं आहे. समीर वानखेडेंच्या नावाने एफआयआर दाखल होणार नसून घटनेवर होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. या प्रकरणात सुरु असलेली खंडणी, फरार पंच प्रकरणात आरोपीला पकडतात, कोऱ्या कागदावर सही, तपास याबाबत एफआयआर दाखल करण्यात येऊन पोलीस सत्यता तपासून कारवाई करण्यात येणार आहे. पंचाच्या म्हणण्यानुसार चौकशी होणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनसीबीच्या कारवाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात घडत असलेल्या घटनांवर चिंता व्यक्त केली असल्याचे मलिक यांनी सांगितले.