सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (15:58 IST)

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मुख्य साक्षीदार किरण गोसावी याच्या बॉडीगार्डने खळबळजनक आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडें यांच्यावर पुन्हा आरोप केले आहेत. तसेच नवाब मलिक  यांनी मुंबईत अंमली पदार्थ प्रकरणात जी कारवाई होत आहे, ती केवळ वसुलीच्या उद्देशाने केली जात असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
 
गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान  अंमली पदार्थ प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे षडयंत्र समोर आल्याचा दावा नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात श्रीमंतांना अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत, ते देखील याविषयी बोलतीलच, असंही मलिक म्हणाले.
 
बोगस केसेस तयार करुन सेलेब्रिटी आणि श्रीमंतांना त्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून तोडपाणी करुन पैसे लाटायचे, असा उद्योग एनसीबीमधील (NCP) अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी (Bollywood drug case) गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं.

मात्र, अद्याप एकालाही साधी अटक करण्यात आली नसल्याचे सांगत मलीक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडले.
 
एसआयटीची (SIT) मागणी
 
एनसीबी अधिकाऱ्यांकडून होणारी वसुली चिंतेची बाब असून गोसावी कोण आहे, संघटित गुन्हेगारी सुरु झाली आहे का, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.परमबीर सिंह  सारखे लोक पुन्हा सक्रीय झाले असून त्यामुळे तोडपाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.