सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:11 IST)

नवाब मलिक : वानखेडेंनी माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करावा

एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे त्याची चौकशी करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
 
समीर वानखेडे यांनी 26 प्रकरणांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने निनावी पत्र लिहून आपल्याला ही माहिती दिल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
 
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार आहे. त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. समीर यांचं पहिलं लग्न इस्लामी पद्धतीनं झालं होतं. त्यांनी खोट प्रमाणपत्र सादर करून एका मागासवर्गीयाचा हक्क हिसकावला आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
"भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने धर्म बदलल्यानंतर जात कायम राहात नाही, धर्म बदलला नसल्याचं वानखेडेंचं म्हणणं असेल तर त्यांनी जन्मदाखला दाखवावा," असं मलिक यांनी म्हटलंय.
 
समीर वानखेडे यांनी 1000 कोटींपेक्षा जास्तीची वसुली केली आहे. मालदीवमध्येही वसुली झाली होती, असा दावा मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडेंनी कोणत्या अधिकाराने माझ्या मुलीच्या निलोफर मलिकचे कॉल रेकॉर्ड डीटेल्स मागितले? हा खासगी हक्कांचा भंग नाही का, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
 
समीर वानखेडे 2 लोकांमार्फत फोन टॅप करतायत, इंटरसेप्ट करताय. एक मुंबईत एक ठाण्यात आहेत, असा आरोपसुद्धा त्यांनी केलाय.
 
दाऊद वानखेडे यांनी माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करावा असं मी त्यांना आव्हान करतो, असं मलिक म्हणाले आहेत.
 
कोणत्याही चौकशीला तयार - वानखेडे
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांची आता खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. समीर वानखेडे सध्या दिल्लीत आहेत.
 
"काही जण मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचं वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे," असं समीर वानखेडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
 
प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. तसंच NCB ची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचा दावा NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
 
"गुन्ह्याची चौकशी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी साईल यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसंच साक्षीदाराने हे प्रतिज्ञापत्र कूहेतूने दाखल केलंय," असं NCBने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
 
NCB वर खंडणी वसूल करण्याचे आरोप करणं म्हणजे चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे, असंसुद्धा त्यांनी म्हटलंय