विरोधकांच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी
एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद केल्यानंतर गेल्या वीस दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ विरोधकांनी सोमवार दिनांक २८ नोव्हेंबरला 'आक्रोश दिन' पाळण्याचे ठरवले होते. या दिवसानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे आणि निषेध सभांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारे तब्बल चौदा पक्ष देशभरात निघणाऱ्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विरोधकांच्या आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने कोणतेही नियोजन न करता देशभरात ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम आता प्रत्येक क्षेत्रात दिसू लागले आहेत. बँकांसमोर सर्वसामान्यांच्या रांगा अजूनही कायम असून देशभरातील व्यापारउदीम थंडावला आहे. छाटे व्यापारी, शेतकरी, कामकरी वर्ग या सर्वांनाच या नोटबंदीचा फटका बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे. तसेच या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन स्वरूपाचे विपरित परिणाम होणार असल्याचा दावा अर्थतज्ज्ञ करत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचा देशपातळीवर निषेध करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईत देखील एका आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कलिना येथील मुंबई विदयापीठाच्या विद्यानगरी संकुलापासून सुरू होऊन हा मोर्चा खेरवाडी सिग्नल येथे समाप्त झाला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती मा. अहिर यांनी दिली आहे. या मोर्चाद्वारे आम्ही सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.