शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (16:31 IST)

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपात असते : नारायण राणे

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपात असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती”, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
“जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामापुरात जाऊन उत्तर देणार. पुढचे सरकार आमचेच येणार हे बोलण्याऐवजी जयंत पाटील पुढील सरकारमध्ये मीच मंत्री असेन असं बोलले असतील. आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्यात इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे”, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
 
जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राणेंवर खोचक शब्दात टीका केली होती. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. त्याचबरोबर राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. जयंत पाटलांच्या या टीकेला राणेंनी उत्तर दिलं आहे.