मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 4 मे 2020 (16:49 IST)

ट्रोलिंगवरून भाजपनं रडीचा डाव खेळू नये - जयंत पाटील

एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी लढत असतानाच, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

ट्रोलिंगवरून भाजपनं रडीचा डाव खेळू नये, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून अश्लील शब्दात टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. भाजपचे शिष्टमंडळच आयुक्तांच्या भेटीला गेले होते.
मात्र, भाजपच्या या तक्रारीवर जयंत पाटील यांनी टीका केलीय. ते म्हणाले, "गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर अत्यंत अश्लील टीका होत होती. त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीय. भाजपाने रडीचा डाव खेळू नये."
तसंच, "आज संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना, भाजप नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?" असा सवालही जयंत पाटलांनी भाजप नेत्यांना उद्देशून विचारलाय.